बारामती पोटनिवडणुकीवर संभाजीराजेंची भूमिका; “निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती”

1 Min Read

दि.०६(पीसीबी)राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा देखील पार पडला. दरम्यान, काँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, “अजितदादांचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती.” कर्तृत्ववान व्यक्तीच्या निधनानंतर त्या ठिकाणी निवडणूक होण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच, सार्वत्रिक निवडणुकीत कोणीही उमेदवारी करावी, मात्र अशा भावनिक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध निवड होणे योग्य ठरेल, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघातही दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजपने त्यांचे पुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले की, “राहुरीतील निवडणूक देखील भावनिक आहे. तिथेही याच भूमिकेने विचार होणे आवश्यक आहे.”या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या पोटनिवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article