जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या ‘फॅक्ट शीट’नुसार, जगभरात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा वाटा अत्यंत मोठा आणि चिंताजनक आहे. आकडेवारीनुसार, २००० ते २०१९ या दोन दशकांच्या काळात भारतात सुमारे १२ लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे, म्हणजेच दरवर्षी सरासरी ५८,००० भारतीयांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
WHO च्या अहवालानुसार, सर्पदंशाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतमजूर आणि मुलांना बसत आहे. शेतात काम करताना किंवा उघड्यावर झोपल्यामुळे सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. मुलांचे शरीराचे वजन कमी असल्याने विषाचा प्रभाव त्यांच्यावर प्रौढांच्या तुलनेत वेगाने आणि गंभीर स्वरूपात होतो.
भारतातील सर्वात घातक ४ साप
भारतात आढळणाऱ्या शेकडो प्रजातींपैकी मुख्यत्वे चार प्रकारचे साप मानवी मृत्यूसाठी सर्वाधिक जबाबदार आहेत, ज्यांना ‘बिग फोर’ म्हटले जाते:
१. नाग (Spectacled Cobra): याच्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन श्वसनक्रिया बंद पडते.
२. मण्यार (Common Krait): हा साप रात्रीचा चावतो. याचे दात अतिशय बारीक असल्याने अनेकदा चावल्याचे लक्षात येत नाही, पण याचे विष अत्यंत जहाल असते.
३. घोणस (Russell’s Viper): याच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मूत्रपिंड (Kidney) निकामी होऊ शकते.
४. फुरसे (Saw-scaled Viper): आकाराने लहान असला तरी हा साप अत्यंत आक्रमक असतो आणि याच्या विषामुळे शरीरातील टिश्युजचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
WHO च्या मते, सर्पदंशामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहेत, तरीही खालील कारणांमुळे मृत्यूचा आकडा मोठा आहे. ग्रामीण भागात आजही इस्पितळात जाण्याऐवजी मांत्रिक किंवा घरगुती उपचारांकडे वळल्यामुळे उपचारात वेळ जातो. अनेक दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विषावरील उतारा वेळेवर उपलब्ध होत नाही. तसेच सरकारी दप्तरी नोंदवल्या जाणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या ३० पटीने जास्त असू शकते, असेही अभ्यासात समोर आले आहे.
सर्पदंश टाळण्यासाठी रात्री बाहेर पडताना बॅटरीचा वापर करणे, पायात पूर्ण बूट घालणे आणि घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यास रुग्णाला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात नेणे हाच जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.









































