दि.२९(पीसीबी)-गेल्या ३० दिवसांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट भारतात उमटताना दिसत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इंधन दरांमध्ये झालेली मोठी वाढ आणि त्यातून निर्माण झालेली गॅस टंचाई आता गंभीर स्वरूप धारण करत आहे.या टंचाईचा पहिला बळी अकोला जिल्ह्यात गेला असून, सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असताना एका माजी सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोल्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. कडक उन्हाचा तडाखा आणि तासन तास प्रतीक्षा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. दुर्दैवाने, वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गॅस वितरणातील विस्कळीत व्यवस्था आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांना सिलेंडरसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी तर बुकिंगनंतर २० ते २५ दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, गॅस एजन्सीसमोरील गर्दी आणि व्यवस्थेतील त्रुटींवर रोष व्यक्त केला जात आहे. अन्वी मिर्झापूर गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका करत, “राज्यात गॅस मुबलक असल्याचा दावा करणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती पाहावी,” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, शिरसाट कुटुंबीयांची माफी मागावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभं राहावं लागणं आणि त्यातून जीव गमवावा लागणं, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. येत्या काळात या प्रकरणात काय कारवाई होते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









































