हिंदू समाजाचे एकत्रीकरण व हिंदू धर्माबद्दल अभिमान जागृती

0
2

बिजलीनगर येथे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

दि.२५(पीसीबी) – महाराष्ट्राची संस्कृती व समाज टिकवून ठेवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज व नंतर संभाजी महाराजांनी केले त्यामुळे सत्तावीस वर्ष मुघल साम्राज्यांना जंग-जंग पछाडूनही महाराष्ट्राला धक्का लावू शकले नाहीत असे प्रतिपादन श्री योगेशजी सोमण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.निमित्त होते सकल हिंदू संमेलनाचे. बिजलीनगर येथे आयोजित भव्य हिंदू संमेलनात ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिला ,पुरुष, युवक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री सोमण म्हणाले, हिंदू समाजाकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट यांना सर्व सरदारासमोर प्रतिउत्तर दिले. संभाजी महाराजांनी अनेक यातना सोसून सुद्धा धर्मांतराला विरोध केला व शेवटपर्यंत आपला धर्म सोडला नाही. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना अंदमान निकोबारला मोठा नाविक तळ उभारण्याची प्रतिज्ञा केली व धर्मांतरित हिंदू कैद्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
धर्मो रक्षतिरक्षतः या उक्तीची सार्थकता त्यांनी आपल्या ओघवत्या शैली मधून व्यक्त केली.

त्यानंतर पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री गिरिष जी प्रभुणे यांनी 1925 साली हेडगेवार यांनी संघाची स्थापना करताना तळागाळातील हिंदू समाज संघटित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. समाजातील विविध स्तरांमध्ये संघाच्या प्रेरणेने अनेक कामे कार्यकर्त्यांच्या मदतीने उभी केली. वनवासी समाज, विद्यार्थी, महिलांपर्यंत विविध माध्यमातून समाजसेवेची व्यापक चळवळ उभी केली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयोस्तुते या स्फूर्ती गीताने झाली. गणेश वंदने नंतर प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. याप्रसंगी सांस्कृतिक वारसा पत्राच्या “संघयात्रा” या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बिजलीनगर मधील महिलांनी सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने झाली.
कार्यक्रमानंतर वंदे मातरम या गीताने व सहभोजनाने सांगता झाली.