अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापलं; पडळकरांचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप

0
4

दि.२५(पीसीबी)- नाशिक येथील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांवरील अत्याचार, बलात्कार, फसवणूक आणि कोट्यवधींची आर्थिक गैरव्यवहार या गंभीर आरोपांमुळे खरात अडचणीत सापडला असून न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे.

पडळकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राला समृद्ध संतपरंपरा लाभली असून भोंदूगिरी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशोक खरातने अत्यंत घृणास्पद कृत्ये केली असून त्याच्यावर कारवाई केल्याबद्दल सरकारचे त्यांनी समर्थन केले.

याचवेळी, या प्रकरणाचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या एक ते दीड वर्षांपासून पाठपुरावा केल्याचा दावा करत पडळकरांनी धक्कादायक आरोपांची मालिका केली. त्यांनी जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, त्यांचे खरातशी संबंध असल्याचे सूचक वक्तव्य केले. तसेच, जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खरातकडे जाऊन काही धार्मिक विधी केल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

पडळकर यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना खरातच्या संस्थेला दारणा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी पाइपलाइन देण्यात आल्याचा आरोप केला. या निर्णयामागील भूमिका तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत जयंत पाटील किंवा संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक खरात प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकटीतच नव्हे, तर राजकीय पातळीवरही मोठा वाद निर्माण करत असून येत्या काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.