हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा!सरकार ने घेतला हा महत्वाचा निर्णय

0
3

दि.२२(पीसीबी)- पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशाच्या इंधन व्यवस्थेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. इंधन टंचाईमुळे अनेक हॉटेल, ढाबे आणि खाद्य व्यवसाय अडचणीत आले असतानाच, केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.व्यावसायिक LPG गॅसच्या वाटपात थेट २० टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली असून, एकूण वाटप आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या निर्णयामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि कॅन्टीन व्यवसायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम आशियातील युद्धामुळे सुरुवातीला भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. घरगुती वापराला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रातील गॅस पुरवठा कमी करण्यात आला होता. मात्र, परिस्थिती सुधारताच सरकारने टप्प्याटप्प्याने पुरवठा वाढवण्यास सुरुवात केली आहे.शनिवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात, सरकारने आणखी २० टक्के अतिरिक्त वाटप जाहीर केले. यासोबतच स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या स्वरूपात मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

पेट्रोलियम विभागाने राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, अतिरिक्त गॅस वाटपाचा लाभ घेण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांनी तेल कंपन्यांकडे नोंदणी करून पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायू म्हणजेच PNG कनेक्शनसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.दरम्यान, सरकारने नागरिकांना दिलासा देत स्पष्ट केले आहे की, घरगुती LPG पुरवठा पूर्णपणे स्थिर आहे आणि कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जादा बुकिंग न करता नियमित घरपोच सेवांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, PNG आणि CNG सारख्या प्राधान्य क्षेत्रांना नियमित पुरवठा सुरू असून, औद्योगिक क्षेत्रालाही सुमारे ८० टक्के गॅस पुरवठा दिला जात आहे. देशातील सर्व रिफायनरी पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.एकूणच, इंधन तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे हे पाऊल व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरत आहे.