प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डिझेलमध्ये वाढ! जाणून घ्या आजचे दर

0
2

दि.२१(पीसीबी)-मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 108 ते 119 डॉलरपर्यंत पोहोचल्याने देशातील तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

नव्या दरांनुसार प्रीमियम पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर सुमारे 2 रुपयांची वाढ झाली असून दिल्लीमध्ये हा दर 101.89 रुपये प्रति लिटरवर गेला आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरात तब्बल 20 ते 22 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून मुंबईमध्ये हा दर 113.11 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर इंधन खर्चाचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामान्य नागरिक वापरत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर या दराने स्थिर ठेवण्यात आले आहे. प्रीमियम इंधनाचा वापर देशात केवळ 2 ते 4 टक्के असल्याने या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. जहाजांचे मार्ग बदलणे, वाहतुकीचा वाढलेला कालावधी आणि विमा खर्चातील वाढ यामुळे इंधन दरांवर दबाव वाढत आहे. भारत आपल्या सुमारे 88 टक्के कच्च्या तेलाच्या गरजा आयातीद्वारे पूर्ण करत असल्याने जागतिक घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे.

सध्या तेल कंपन्या वाढलेल्या किमतींचा काही भार स्वतः सहन करत असून, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सामान्य पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.