नाटोने दिला नकार,ट्रम्प एकाकी? इराण संघर्षात अमेरिकेची कोंडी

bpcauthor
2 Min Read

दि.१७(पीसीबी)-इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा आंतरराष्ट्रीय धक्का बसल्याचे चित्र समोर येत आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मित्रदेशांनी युद्धनौका पाठवाव्यात, अशी विनंती ट्रम्प यांनी केली होती. मात्र, नाटो देशांसह अनेक राष्ट्रांनी ही विनंती स्पष्टपणे फेटाळून लावल्याने अमेरिका सध्या एकाकी पडल्याचे दिसत आहे.

ट्रम्प यांनी जर्मनी, स्पेन, इटलीसह सुमारे सात देशांशी चर्चा केली होती. पण इटलीने अमेरिका-इस्रायल कारवाईला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरवले, तर जर्मनीने “हे आमचं युद्ध नाही” अशी भूमिका घेतली. स्पेनने युद्धाऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला. जपान, ऑस्ट्रेलिया आणि तुर्किए यांनीही हॉर्मुझमध्ये आपली नौदल शक्ती पाठवण्यास नकार दिला. ब्रिटनने सुरुवातीला मदतीस नकार दिला आणि नंतर संघर्ष संपल्यानंतर मदत देण्याची तयारी दर्शवली, मात्र ट्रम्प यांनी ती ऑफरही नाकारली.

या पार्श्वभूमीवर ट्रम्प संतप्त झाल्याचे दिसले. “आम्हाला कोणाचीही गरज नाही, आमचं लष्कर जगात सर्वात शक्तिशाली आहे,” असे ठाम विधान त्यांनी केले. तसेच, मित्रदेशांनी साथ दिली नाही तर नाटो संघटनेचं भविष्य अंधकारमय होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, ट्रम्प यांनी इराणविरुद्ध मोठा दावा करत “इराणची 100 जहाजं आणि युद्धनौका बुडवली, त्यांची हवाई आणि नौदल शक्ती संपवली,” असे म्हटले. तसेच इराणची अँटी-एअरक्राफ्ट सिस्टीम आणि रडार नष्ट केल्याचा दावा करत त्यांनी इराणच्या नेतृत्वावरही गंभीर आरोप केले.

या सर्व घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांमधील दरी अधिक स्पष्टपणे समोर येत आहे.आता या संघर्षात पुढे काय घडणार? जगाचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे.

Share This Article