भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

0
8

दि.१७(पीसीबी)-पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर या प्रकल्पाचा मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात आहे. त्यामुळे या मार्गात बदल करावा. धार्मिक भावना व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी रेल्वे मार्गाची अलाईनमेंट बदलवावी. पुणे ते लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरु करावी. पुणे–लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनेही यास गती देण्यासह राज्यातील विविध रेल्वेच्या प्रश्नांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

रेल्वेच्या २०१६-२७ च्या अर्थसंकल्पावर शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्राशी संबंधित विविध रेल्वे विषयक महत्त्वाचे प्रश्न मांडले. वाढत्या प्रवासी संख्येचा आणि औद्योगिक तसेच पर्यटन क्षेत्राच्या गरजांचा विचार करता महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना अधिक गती देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. खासदार बारणे म्हणाले, देशात चार हजार किलोमीटर हाय स्पीड कॉरिडोर बनविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि बंगळुरु या प्रमुख आर्थिक शहराला हा कॉरिडोर जोडणार आहे. यामुळे रेल्वेची नवीन आणि आधुनिक क्रांती होईल. मुंबई परिसरात जागा नसल्याने भुयारी किंवा ओव्हर राईड रेल्वे करण्याची गरज आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा स्थानकावर मुंबई–पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला थांबा द्यावा.

पुणे ते लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरु करावी. पुणे–लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनेही यास गती दिल्यास लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, लोणावळा आणि पनवेल स्थानकांच्या पुनर्विकास केला आहे. कर्जत स्थानक राहिले आहे. कर्जत स्थानकाचाही समावेश करावा. कर्जत रेल्वे स्टेशन तयार होत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ रायगडपर्यंत विस्तारला आहे. श्री संत तुकाराम महाराजांची पावन भूमी देहूगाव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची तपोवन भूमी आळंदीत वर्षभरात लाखो वारकरी येतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी या पवित्र स्थळांपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याबरोबरच वारकऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात यावी. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करावे. ही तीर्थस्थळे भक्तीची केंद्रे आहेत. चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूर ते पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरु करावी. महाराष्ट्रातील प्रवासी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत. लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी सुविधा करावी. रेल्वे विभागाच्या जागेवर झालेल्या झोपड्यांवर एसआरए योजना लागू करावी. झोपडीत राहणाऱ्या लोकांना हक्काचे घर मिळेल, असेही खासदार बारणे म्हणाले.