अमेरिकन आयोगाची भारतावर टीका; RSS आणि RAW वर निर्बंधांची ट्रम्प यांच्याकडे शिफारस

0
2

दि.१६(पीसीबी):अमेरिकेतील U.S. Commission on International Religious Freedom म्हणजेच USCIRF ने आपल्या २०२६ च्या वार्षिक अहवालात भारताबाबत गंभीर आरोप केले आहेत. या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती खालावत असल्याचा दावा करण्यात आला असून Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)आणि Research and Analysis Wing (RAW)या संस्थांवर निर्बंध लावण्याची शिफारस अमेरिकन प्रशासनाला करण्यात आली आहे.

आयोगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या प्रशासनाला दिलेल्या शिफारसींमध्ये आरएसएस आणि रॉशी संबंधित व्यक्तींवर लक्ष्यित निर्बंध लादणे, त्यांच्या मालमत्ता गोठवणे आणि त्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच अमेरिकेकडून भारताला होणारी शस्त्रास्त्र विक्री आणि व्यापार हे धार्मिक स्वातंत्र्याच्या अटींशी जोडण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय भारताला सलग सातव्या वर्षी “कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न” म्हणून घोषित करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. आयोगाच्या मते भारतात धार्मिक अल्पसंख्याकांची परिस्थिती बिघडत असून काही कायदे आणि घटनांमुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, भारत सरकारने हा अहवाल फेटाळून लावला आहे. Ministry of External Affairs, India ने प्रतिक्रिया देताना हा अहवाल पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. भारत हा विविध धर्मांचा देश असून येथे सर्व धर्मांचे लोक शांततेत राहतात, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, १९९८ मध्ये अमेरिकन काँग्रेसने स्थापन केलेला USCIRF हा स्वतंत्र आयोग असून तो जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत अहवाल तयार करून अमेरिकन सरकारला शिफारसी देतो. मात्र, या आयोगाच्या शिफारसी मानणे अमेरिकन प्रशासनासाठी बंधनकारक नसते.