भाजपाची काँग्रेस आमदारासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर

0
2

दि.१६(पीसीबी)-राज्यसभेच्या ११ जागांसाठी तीन राज्यांत मतदान होत असताना ऑपरेशन लोटसचा कथित मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. ओडिशातील काँग्रेसच्या आठ आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाने प्रत्येकी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या या आरोपांमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या आरोपांची दखल घेऊन पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली. त्यातील एक संशयित हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची चर्चा रंगली. यादरम्यान काँग्रेसने केलेले सर्व आरोप भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावले.

१८ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली, त्यामध्ये महाराष्ट्रासह ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणाचा समावेश आहे. या १० पैकी तब्बल सात राज्यातील ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित बिहार, ओडिशा आणि हरियाणामधील ११ जागांसाठी चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यासाठी सोमवारी (१६ मार्च) मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यादरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने ओडिशातील आपल्या १४ पैकी आठ आमदारांना बेंगळुरू येथील एका हॉटेलात ठेवले होते. शिवकुमार यांनी केलेल्या आरोपानुसार, रविवारी काही व्यक्ती हॉटेलात शिरले आणि त्यांनी आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता या व्यक्तींनी काँग्रेसच्या आमदारांना क्रॉस व्होटिंगसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची ऑफरही दिली. उपमुख्यमंत्र्यांनी भरपत्रकार परिषदेत केलेल्या या खळबळजनक आरोपांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. त्यातील एक संशयित हा ओडिशातील भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्या संदर्भात कोराटपूरचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ओडिशाच्या राउरकेला येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे कोरे चेक सापडले असून चौकशीत त्यांनी भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचे नाव घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसचे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, ते हॉटेलदेखील दिलीप राय यांच्याच मालकीचे असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदाराने केला आहे. या आरोपांमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढळवून निघाले आहे.

काँग्रेसने केलेले सर्व आरोप भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. भाजपाने या आरोपांना केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेत पराभव दिसत असल्याने काँग्रेसचे नेते असे निराधार आरोप करत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. त्यांनी डी. के. शिवकुमार यांना या आरोपांचे ठोस पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी ऑपरेशन लोटसचा बागुलबुवा केला जात असल्याची टीका भाजपाने केली आहे. काँग्रेसला आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच त्यांना हॉटेलात ठेवल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. यादरम्यान राज्यसभेच्या ११ जागांसाठी चुरस वाढल्याने दोन्ही काँग्रेस व भाजपाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.

राज्यसभेच्या ११ जागांपैकी बिहारमध्ये पाच, ओडिशातील प्रत्येकी चार आणि हरियाणातील दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. बिहार विधानसभेत २४३ आमदारांचे संख्याबळ असून त्यातील तब्बल २०२ आमदार भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे आहेत; तर विरोधकांच्या महाआघाडीकडे केवळ ३५ आमदार आहेत. या निवडणुकीत भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाच्या चार उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. पाचवी जागा मिळण्यासाठी त्यांना तीन आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. राज्यसभेची एक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महाआघाडीला सहा आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.