आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे कायमस्वरूपी हस्तांतर करण्याची मागणी
पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा
पिंपरी, दि. १३ – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता वेग आला आहे. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण आणि रावेत येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे आधुनिकीकरण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आमदार शंकर जगताप यांच्याकडून केला जात आहे. यासंदर्भात भाजपा महायुती सरकार सकारात्मक असून, आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतर कायमस्वरूपी करणे आणि रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी 105 कोटी रुपयांची निधी देण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुदानाच्या मागण्यांदरम्यान केली. या माध्यमातून पाणी टंचाईवर तोडगा निघणार असून, शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, शहराला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जॅकवेल, अप्रोच चॅनेल, पंप हाऊस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहे. मुख्य अभियंता (जलसंपदा) यांनी हा प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठवला असून, या जमिनीचे मूल्यांकन व हस्तांतरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे आंद्रा धरणाचे पाणी थेट शहरात पोहोचवण्यातील तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.
रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी निधी द्या
दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारा रावेत येथील पवना नदीवरील बंधारा ब्रिटिशकालीन असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन दररोज सुमारे ५ कोटी लिटर पाणी वाया जाते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून जुन्या पद्धतीचा बंधारा बदलून तिथे व्हर्टिकल लिफ्ट शाफ्ट (उभी उचल पद्धत) हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधुनिक बंधाऱ्यामुळे गाळ साचण्याची समस्या दूर होईल आणि पाण्याचा अपव्यय थांबेल. या प्रकल्पासाठी १०५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्याला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे .
१ मौजे शिरे येथील 0.95 हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव
२ नवीन रावेत बंधाऱ्यासाठी १०५ कोटींचा खर्च करून व्हर्टिकल लिफ्ट शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार.
३ दररोज वाया जाणारे ५ कोटी लिटर पाणी वाचणार.
४ पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी जलनियोजनावर भर.
“पिंपरी-चिंचवडकरांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये. यासाठी आंद्रा धरण प्रकल्प आणि रावेतचा नवीन बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही कामांना गती मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, पाणी टंचाईवर तोडगा काढून पाणीपुरवठ्याचे नियोजन मार्गी लावणे हे आमचे प्राधान्य आहे”, असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.











































