महापालिकेत स्वीकृत सदस्य पदावरून भाजपात नाराजी; पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

2 Min Read

दि.१३(पीसीबी) -लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमत मिळवत सत्तेवर वर्चस्व मिळवले आहे. महापौर, उपमहापौर आणि महत्त्वाच्या पदांवरही आघाडीचा ताबा आहे. तर दुसरीकडे, महापालिकेत हिरो ठरण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे.निवडणुकीदरम्यान इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना स्वीकृत सदस्य पदाचे आश्वासन देत शांत करण्यात आले होते. मात्र आता त्याच पदांवरून नाराजी उफाळून येताना दिसत आहे.

दरम्यान, लातूर महापालिकेत एका इच्छुकाचे नाव स्वीकृत सदस्य म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे संबंधित कार्यकर्ता आनंदात होता. पण काही तासांतच त्याचे नाव यादीतून वगळल्याचे समोर आले.यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे लातूरमधील पदाधिकारी संजय गिर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हातात डिझेलची कॅन घेऊन त्यांनी अंगावर डिझेल ओतण्याची तयारी केली होती. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

लातूर महापालिकेत भाजपाने २२ जागा जिंकल्या असल्याने पक्षाला दोन स्वीकृत सदस्य पदे मिळणार आहेत. त्यासाठी निवड प्रक्रिया सुरू असताना प्रदेश पातळीवरून एका नावाची घोषणा पत्राद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी ते नाव रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली.या घटनेनंतर संजय गिर यांनी संताप व्यक्त करत स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले.“गेल्या २० ते २५ वर्षांपासून मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. काल स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव सोशल मीडियावर जाहीर झाले, मात्र आज अचानक ते वगळण्यात आले. त्यामुळे मला मोठी नाराजी आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षातील गटबाजीवरही संताप व्यक्त केला.या घटनेमुळे लातूर भाजपामधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

Share This Article