अर्थसंकल्पातील तरतूदीनंतर खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

0
3

पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. राज्य शासनाने निधीची तरतूद केल्याने आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅकचा गरज त्यांना समजावू सांगितली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरु आहे. याचा दररोज एक ते सव्वा लाख प्रवासी लाभ घेतात. या मार्गावर दोन ट्रॅकवरच रेल्वे धावतात. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे शक्य नाही. सन २०१७ मध्ये पुणे ते लोणावळा लोहमार्गावर तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला मान्यता देण्यात आली.

रेल्वे विभागाने सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. ट्रॅकसाठी आवश्यक जागाही रेल्वे विभागाकडे आहे. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने ट्रॅकच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही. रेल्वे मंत्री वैष्णव यांनीही या प्रस्तावित ट्रॅकची पाहणी केली होती. निधी देण्याच्या सूचना राज्याच्या सचिवांना दिल्या होत्या. या ट्रॅकसाठी राज्य सरकार ५० टक्के आणि केंद्र सरकारची ५० टक्के हिस्सेदारी निश्चित आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याला रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारने निधीची तरतूद केल्याने आता केंद्र सरकार तातडीने पाऊले उचलेल अशी ग्वाही वैष्णव यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

e3b418a3-1afa-49c7-b5f9-3d4aa4eb61bb.jfif
dd24d4e0-0f97-4292-a4f8-58be5582c115.jfif