अखेर ३५ लाख टन कच्च्या तेलासह जहाज मुंबईत दाखल!

0
4

दि.१२(पीसीबी)-इराण-इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या १३ दिवसांपासून दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून या युद्धाचा परिणाम आता जागतिक इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे.दरम्यान, या तणावपूर्ण परिस्थितीत एक महत्त्वाची घटना घडली आहे. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाने भरलेले एक मोठे तेलवाहू जहाज यशस्वीरित्या होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईत पोहोचले आहे.

हे जहाज लायबेरियाच्या ध्वजाखालील ‘शेनलॉन्ग’ नावाचे सुएझमॅक्स प्रकारातील तेलवाहू टँकर आहे. या जहाजात सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून तब्बल १ लाख ३५ हजार ३३५ टन कच्चे तेल भरले गेले होते. युद्धाच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी या जहाजाने प्रवासादरम्यान आपली AIS सिग्नल सिस्टीम बंद ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे.

आज हे जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात दाखल झाले असून मुंबई पोर्ट अथॉरिटीने याची अधिकृत पुष्टी केली आहे. जहाजातील कच्चे तेल मुंबई डॉकवरून माहुल येथील रिफायनरीकडे पाठवले जाणार आहे.

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याने इंधन पुरवठ्याबाबत काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे