“मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक ताळेबंद नसून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप आहे. दिवंगत अजितदादांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नावाने ‘अजित पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याचा तसेच त्यांच्या कार्याची आठवण जपणारे स्मारक उभारण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यांच्या प्रशासनातील शिस्त आणि विकासदृष्टीला हा योग्य सन्मान आहे.
अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समिती गठित करण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा, ही या निर्णयामागची भूमिका असून वंचित घटकांना न्याय देण्याचा सरकारचा स्पष्ट प्रयत्न यातून दिसून येतो.
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची भरीव तरतूद आणि २५ लाख ‘लखपती दीदी’ घडवण्याचे उद्दिष्ट हे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर पदभरती, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि कौशल्य विकासावर दिलेला भर हा राज्यातील तरुणाईसाठी संधी निर्माण करणारा आहे.
तसेच पुणे मेट्रोचा विस्तार, बुलेट ट्रेन प्रकल्प, आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या तरतुदीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी केलेल्या तरतुदीमुळे श्रद्धा आणि विकास यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसतो.
एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी आणि सामान्य जनतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारा आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”












































