दि.२३(पीसीबी)-आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कामकाजाच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत असताना आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅक्सेंचरने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी एआयचा वापर अनिवार्य करण्याचा संकेत दिल्याने उद्योगक्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, अॅक्सेंचरने असोसिएट डायरेक्टर्स आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना ईमेलद्वारे सूचित केले आहे की नेतृत्व पदांवर बढती मिळवण्यासाठी कामात नियमितपणे एआयचा वापर करणे आवश्यक असेल. याचा अर्थ, जे कर्मचारी एआयचा वापर करत नाहीत त्यांची पदोन्नतीची शक्यता कमी होऊ शकते. म्हणजेच भविष्यात कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन त्यांच्या कौशल्यांसोबत एआय वापरण्याच्या क्षमतेवरही होणार आहे.
एआयकडे कंपनीचा वाढता कल :
अॅक्सेंचर सध्या मोठ्या प्रमाणावर एआय तंत्रज्ञानाकडे वळत असून भविष्यातील व्यवसाय धोरणात त्याला केंद्रस्थानी स्थान देण्याची तयारी सुरू आहे. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान कंपनीच्या सीईओ ज्युली स्वीट यांनी एआय हे कंपन्यांच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले होते.
उद्योगक्षेत्रात खळबळ :
या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय इतर तंत्रज्ञान कंपन्यांसाठीही नवा ट्रेंड ठरू शकतो. भविष्यात नोकरी टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी एआय कौशल्य अनिवार्य ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







































