दि.२३(पीसीबी)- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने पोकळी या शब्दाची व्याप्ती आता कळायला लागली आहे. त्यांची पोकळी भरून काढणं शक्य नाही आणि दादांसारखा नेता पुन्हा होणं अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, अजित पवार हे उत्तम मुख्यमंत्री होते, जो महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी आज म्हटलं. ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या शोकप्रस्तावात म्हणाले.
अजित पवार कठोर निर्णय घ्यायचे
“अधिवेशनाच्या काळात सर्वांत आधी अजित पवार विधानभवनात यायचे. नेहमीच खुर्चीत दादा दिसायचे. सभागृह कितीही काळ चाललं तर दादा आपल्याजागी बसलेले पाहायला मिळायचे. आज ते आपल्यात नाहीत ही निश्चितपणे खंत आहे. यावर्षी दादांनी बारावं अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी १३ वा अर्थसंक्लप मांडून बॅरिस्टर शेषराव यांच्याबरोबर बरोबरी केली असती. कदाचित त्या नंतरच्या कालावधीत सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून दादांकडे पाहिलं असतं. पण त्याआधीच दादा गेले. यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की, कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागेपुढे पाहणारे अजित दादा होते. पण त्याचवेळी वित्तविभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल, म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यावरही अजित पवारांनी ठामपणे निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लाडकी बहीण योजनेनंतर अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती. त्यामुळे आम्हालाही गुलाबी जॅकेट घालायला लावलं होतं. आता या गोष्टी फक्त आठवणीत आहेत. खरंतर अशाप्रकारचा प्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबदारी आहे. पण मला असं वाटतं की माझ्याकरता अत्यंत भावनिक प्रसंग आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांची पोकळी कधीच भरून निघणार नाही
यावेळी त्यांनी महाकवी व्यास यांच्या स्वप्नवासवदत्तम् या नाटकातील एक पंक्ती वाचून दाखवली. अजित पवारांचा असा मृत्यू होणं हे खरं म्हणजे राजकीय हानी नाही तर सर्वांच्याच अंत्यकरणाला प्रचंड वेदना देणारी बाब आहे. काही गोष्टींवर काळ हे औषध असतं. पण कितीही काळ गेला तरी काही वेदना कमी होत नाहीत. अशाप्रकारची ही वेदना असणार आहे. अनेकवेळा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असं विधान करतो. ज्येष्ठ नेता निघून गेल्यानंतर त्यावेळी त्यांच्या निधनाने त्यांची कमतरता जाणवते. पण ज्यावेळी अजित दादांसारखा व्यक्ती निघून जातो, तेव्हा पोकळी निर्माण झाली या शब्दाची व्याप्ती लक्षात येते. कारण, अशाप्रकारचे अजित दादा होऊ शकत नाही. त्यामुळे ही पोकळी भरून काढणं कठीण आहे. त्यामुळे त्यांचं अकस्मात निधन एक धक्काच आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.
“कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती” ही प्रेरणादायी काव्यपंक्तीही त्यांनी अजित दादांना स्मरून सभागृहात मांडली. “प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजित दादा, नियोजन करणारे अजित दादा असे नेते राजकारणात विरळ पाहायला मिळतात. आमचा दोघांचाही जन्म २२ जुलैचा. ते ११ वर्षे मोठे होते. खऱ्या अर्थाने ते माझे दादा होते. आमची एक दशकापेक्षा जास्त काळ अतिशय जवळीक होती. अतिशय चांगली मैत्री होती. १९९९ साली दादांची ओळख झाली. पण २०१४ नंतर भावनिक नातं दादांशी तयार झालं. राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे असं म्हणत असताना अजित दादांकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहिलं”, असंही देवेंद्र फडणवी म्हणाले.
२०१९ साली काय झालं?
अनेकांचा आधारवड असलेले, धीर देणारे, निर्णयाचे ताकद असलेले दादा आता नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजित पवार हे शब्दाला जागणारा नेता होते. २०१९ साली आम्ही त्याचा अनुभव घेतला. २०१९ ला सरकार स्थापनेचं ठरलं. पण त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय बदलला. पण त्यांनी मला शब्द दिला होता, त्यामुळे त्यांनी शब्द मोडणार नसल्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी त्याला पहाटेचा शपथविधी म्हटलं. पण तेव्हा अजितदादा नाराज होत. कारण पहाट म्हणजे ६. आम्ही ९ वाजता शपथविधी घेतला होता. अजित पवारांना त्याची किंमत मोजावी लागली असेल. पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, आम्ही दोघंही वर्षा बंगल्यावर होतो. आमच्याविरोधात निर्णय गेल्यानंतर सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं. तेव्हा मी त्यांना त्यांचा निर्णय घ्यायला सांगितला. कारण, त्यांच्यासोबत जे लोक होते, त्यांचंही भविष्य आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर जे सरकार आलं त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय दादांना घेतला”, अशी आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.
अजित पवार उत्तम मुख्यमंत्री बनले असते
खरं म्हणजे दादांसदर्भात अनेक गोष्टी सांगता येतील. दादा अतिशय वक्तशीर होते. पण दादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं. खूप मोठी इनिंग दादा खेळतील, हे सर्वांना दिसत होतं. अशा परिस्थितीत पहिल्यांदा टायमिंग चुकवंल. दादा सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अनेकवेळा ते म्हणायचे, “मी कधीतरी मुख्यमंत्री होईन, पण उपमुख्यमंत्री म्हणून मी कायम राहीन. पण मी इथे म्हणतो की, “अजित दादा पवार वॉज दि बेस्ट चिफ मिनिस्टर जो महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही. तर, कोणत्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर अजितदादांसारखा पाहिजे”, असंही फडणवीसांनी म्हटलं.
“जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पुन आपुले हृदयसिंहासन नित् भजतो मानवतेला जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला”, या काव्यपंक्तीने देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या कार्याचा गौरव केला.






































