पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी धोकादायक

0
2

दि.२३(पीसीबी)-राज्यातील हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले असून तापमानातील मोठ्या चढउतारांदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाचा इशारा आणि येलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहेत. काही शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्वरूपात वाढली असून विशेषतः मुंबई येथे हवेची गुणवत्ता खालावली आहे. कधी उकाडा, कधी गारवा आणि मध्येच अवकाळी पावसाची सर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके वाहून गेली होती. या नुकसानीची पाहणी केंद्र शासनाकडून करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळपास नाहीशी झाली असली तरी पावसाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून पुढील काही तासांत हवामानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नांदेड , लातूर , धाराशिव , हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील तापमानातही मोठी तफावत दिसून आली. निफाड येथे किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे राज्यातील नीचांकी ठरले. तर मुंबईतील सांताक्रूझ येथे कमाल तापमान 36.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दुपारच्या उन्हाच्या तडाख्यानंतर अचानक अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने हवामानातील अस्थिरता स्पष्ट झाली आहे. दिवसभर तापमानात चढउतार राहण्याची शक्यता असून देशातील इतर राज्यांतही जोरदार पावसाची नोंद होत आहे.