छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

0
2

दि.१९(पीसीबी) – “अठरापगड जातींना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला . स्वत्व आणि स्वाभिमान यांची पेरणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एतद्देशीय रयतेचे राज्य निर्माण केले. जनतेला अन्याय, अत्याचार, अनाचार यापासून मुक्त करत लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. वर्षानुवर्षे येणाऱ्या आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला… शिवरायांच्या कार्यामुळे आणि प्रेरणेमुळे पराभूत मानसिकता बदलून मरगळलेल्या समाजात जागृती निर्माण झाली. इतिहासाच्या प्रवाहाची दिशा बदलली. प्रतिकूल परिस्थितीत स्वकीयांचं राज्य निर्माण केले . म्हणून शिवाजी महाराज हे लोकोत्तर युगपुरुष असून लोकशाहीचे उद्गाते आहेत. सदैव जनतेचा विचार करणारे ते लोककल्याणकारी राजे होते.” असे प्रतिपादन शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.
निगडी येथील दुर्गा टेकडी येथे शिवजयंती उत्सव समितीने आयोजित शिवजयंती सोहळ्यामध्ये प्रातःकाळी राजेंद्र घावटे हे “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते…

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप, सूर्योदय ग्रुप यांच्या वतीने शिवजयंतीच्या दिवशी प्रातःकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र बाबर, देविदास ढमे, रवींद्र मोहिते, भरत देशमुख, रघुनाथ रोकडे, मल्लिकार्जुन, दत्ता गोंजारी, कृष्णा साळवे, विलास कुऱ्हाडे, गजानन ढमाले, भगवान पठारे, सुभाष पागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या उत्सव समितीमध्ये समाविष्ट सर्व संस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष देविदास ढमे यांनी केले.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “स्वराज्य हे राजमाता जिजाऊ यांच्या निर्धाराचं प्रतीक आहे. शिवरायांचा इतिहास हा अतुलनीय शौर्याचा आणि धैर्याचा आहे. जगात अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु त्यांचे राज्य त्यांचा नंतर टिकले नाही. महाराजांनंतर स्वराज्य अनेक वर्षे टिकले. दिल्लीसह देशाच्या बहुसंख्य भाग पुढील काळात मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. शिवराज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील एक अलौकिक घटना आहे. राज्याभिषेकमुळे शिवराय छत्रपती झाले आणि त्यांची कीर्ती त्रिखंडात पोहोचली. सर्वदूर हिंदवी स्वराज्याला मान्यता मिळाली. नवीन कालगणना, नाणी, राज्यव्यवहार कोष आणि अष्टप्रधान मंडळ, लोकाभिमुख प्रशासन यामुळे राज्याभिषेकाला विशेष महत्व आहे. शिवरायांच्या चरित्रातून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शिवचरित्रामध्ये भारतवर्षाचे अखंड मार्गदर्शन करण्याची ताकद आहे.” असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन सुप्रभात मित्र परिवार, सूर्यनमस्कार ग्रुप, जय हरी ग्रुप, सूर्योदय ग्रुप या सर्व संघटनांनी केले. बाबा नायकवडी, शंकर राणे, कांशीराम भोसले, विजय शिंदे, सुरेश मुळूक आदींनी सहकार्य केले. देविदास ढमे यांनी सूत्रसंचालन तर रवींद्र मोहिते यांनी आभारप्रदर्शन केले. रोज सकाळी टेकडीवर येणारे नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होतें.