एकिकडे अजितदादांचा अपघाती मृत्यू आणि मंत्रालयात फायलींचा निपटारा

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि. १६(पीसीबी) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात एका खात्यात मात्र सह्यांचा सपाटा सुरू असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या अकाली निधनाने शासकीय दुखवटा असताना राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईत अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचे सांगितले जात असून अजित पवार यांच्या अपघातानंतर काही तासांतच याबाबतची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

अजित पवार हे हयात असताना ज्या फाईल्स पेंडिंग ठेवण्यात आल्या होत्या त्या फाईल्सवर अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात घाईघाईने सह्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही?” असा सवाल करत रोहित पवार यांनी एक्स पोस्टमधून आपल्या भावना मांडल्या आहेत.

सदर वृत्तानुसार, ऑगस्ट 2025 पासून या शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. परंतु अजित पवारांचे निधन होताच सदर स्थगिती डावलत मंत्रालयातून या शाळाना अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात केले गेल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पहिले प्रमाणपत्र अजित पवार यांचे निधन झाले त्याच दिवशी म्हणजेच 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान देण्यात आले.

काँग्रेस आक्रमक, आयोगाच्या अध्यक्षांकडूनही कारवाईची मागणी
शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला असून कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. “सदर शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा हा प्रकार धक्कादायक असून संबंधित अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करत कारवाई करावी” अशी मागणी प्यारे खान यांनी केली आहे.

Share This Article