बलुचिस्तान हिंसाचारात महिलांचा सहभाग? बीएलएचा खळबळजनक दावा

0
3

दि.०६(पीसीबी)-पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) कडून करण्यात आलेल्या समन्वित हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रांतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीएलएने या हल्ल्यांना “ऑपरेशन हेरोफ – फेज 2.0” असे नाव दिले आहे.बीएलएने बलुचिस्तानमधील १२ शहरांमध्ये आत्मघाती व गोळीबाराचे हल्ले करत मुख्यतः पाकिस्तानी लष्कर, सुरक्षा यंत्रणा आणि चीन–पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) शी संबंधित प्रकल्पांना लक्ष्य केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर अनेक ठिकाणी सुरक्षा दल पोहोचण्याआधीच रस्त्यांवर मोकळेपणाने फिरत होते. सामान्य नागरिकांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी अचानक बाजारपेठा, दुकाने आणि सुरक्षा इमारतींवर गोळीबार केला. काही ठिकाणी आत्मघाती हल्ल्यांचे प्रयत्नही करण्यात आले.

या गंभीर परिस्थितीमुळे क्वेटा शहरातील सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली, मोबाईल सेवा जॅम करण्यात आली, तसेच रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली.पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी लष्करी कारवाई सुरू केली. ही चकमक जवळपास ४० तास चालली.पाकिस्तानी अधिकाऱ्यांनुसार, या कारवाईत १४५ हल्लेखोर ठार झाले, तर बीएलएने २०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सुरक्षा दलांचे कौतुक करत दहशतवाद पूर्णपणे संपेपर्यंत कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, बीएलएने केलेल्या दाव्यानुसार, या हल्ल्यांमध्ये दोन बलुच महिलांचा सहभाग होता. संघटनेने यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.बीएलएने सांगितले की, या महिलांपैकी एक २४ वर्षीय आसिफा मेंगल असून तिने जानेवारी २०२४ मध्ये आत्मघाती हल्लेखोर बनण्याचा निर्णय घेतला होता. दुसरी महिला हवा बलुच हिने हल्ल्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सरकारवर टीका केली होती.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर, गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्टी यांनी भारत आणि अफगाणिस्तानवर बीएलएला मदत केल्याचा आरोप केला आहे. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावत, पाकिस्तानने बलुच जनतेच्या खरी मागण्या ऐकाव्यात, असे स्पष्ट केले आहे.

या हिंसाचाराचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून येत असून, चीनने बलुचिस्तानमधील आपली उपस्थिती कमी करण्यास सुरुवात केली आहे. ग्वादर बंदरावरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले असून, भविष्यातील प्रकल्पांबाबत पाकिस्तान पुनर्विचार करू शकतो.दरम्यान, अमेरिकेची बलुचिस्तानमधील खनिज संपत्तीवर नजर असल्याने हा संपूर्ण प्रदेश अधिक संवेदनशील बनला आहे.बलुचिस्तानमधील ही हिंसक घटना प्रादेशिक सुरक्षेसाठी गंभीर इशारा मानली जात असून, त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.