दि. ०४(पीसीबी)-आदरणीय दादा,
आपल्याला जाऊन जेमतेम आठवडा झाला. मात्र आपली एक एक आठवण दररोज नव्याने ताजी होऊन डोळ्यांपुढे तरळत असते. सन २००२ मधील माझी एक आठवण. माझे एक नगरसेवक मित्र, खूप अडचणीत होते. खरे तर ते विरोधी पक्षात कार्यरत होते. त्यांच्या मुलाला किडनीच्या ऑपरेशनसाठी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते. खूप मोठा खर्च होणार होता. आपल्या मध्यस्थीने हॉस्पिटलच्या बिलामध्ये काही सवलत मिळेल, या अपेक्षेने मी त्यांना घेऊन आपल्याकडे आलो होतो. आपण सर्व ऐकून घेतले अन् क्षणाचाही विलंब न लावता स्वीय सहाय्यकांना सांगून हॉस्पिटलमध्ये फोन केला, योग्य त्या सूचना दिल्या. आम्हांला खूप दिलासा मिळाला.
पण एवढ्यावरतीच थांबतील ते अजितदादा कसले ? आपण आम्हांस थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितले. आम्ही आपल्या देवगिरीच्या हॉलमध्ये थोडा वेळ थांबलो. आपल्याकडे विविध कामे घेऊन आलेल्या सर्व लोकांची कामे करून निघताना, आपण बाहेर आलात. त्यावेळी आपल्या स्वीय सहाय्यकाने माझ्या मित्राच्या हाती एक पाकीट दिले. आम्हाला त्याची मुळीच अपेक्षा नव्हती. किंबहुना आपल्याकडे आर्थिक मदतीसाठी आम्ही आलोच नव्हतो. तरीही आपण आग्रहाने ते पैशांचे पाकीट दिले. एक ना दोन.. तब्बल पाच लाख रुपयांची रोख रक्कम त्या पाकिटात होती. आपण त्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, “वाईट वाटून घेऊ नकोस. पण एवढ्या मोठ्या ऑपरेशनसाठी आर्थिक चणचण येऊ शकते, हे पैसे जवळ राहू देत. पण एकच अट, “याविषयी कुठेही वाच्यता करायची नाही. ही बाब आपल्या तिघांतच राहील. तू तुझ्या पक्षाचे काम करत रहा, मी माझ्या पक्षाचे काम करत राहील. मात्र कधीही अडचण आली तरी नक्की ये. तुझा मुलगा बरा होऊदे, यासाठी माझी प्रार्थना.” एवढे बोलून आपण निघून गेलात.
दादा, त्यानंतर त्या मुलाचे ऑपरेशन झाले. तो बराही झाला. पुढे वीस बावीस वर्षांचे आयुष्य त्याला लाभले. त्यानंतर तो जग सोडून गेला. त्यापाठोपाठ दुर्दैवाने माझा मित्रही गेला..!
आणि दादा, मागिल आठवड्यात आपणही निघून गेलात. आता ‘ याविषयी कुठेही वाच्यता करायची नाही’ हे बंधन आता माझ्यावरती उरले नाही. म्हणून आज ही बाब मी प्रथमच जाहीर करीत आहे.
आमचे दादा, कसे होते. तमाम महाराष्ट्र आपणांस जाणतो. गट, तट, पक्षभेद, जातपात विसरून प्रत्येकाला साथ देणारे दादा.. राजकारणाच्या पलिकडे माणसे जपण्याची त्यांची खासियत होती. शिस्त, वक्तशीरपणा, परखडपणा याबरोबरच मनाचा दिलदारपणा, दातृत्व आणि प्रसिद्धीविना कर्म करण्याचा आपला धर्म महाराष्ट्राने अनुभवला आहे.
अशा प्रत्येकाच्या कित्येक आठवणी असतील. अनेकांना आपण नवजीवन दिलेत दादा. काहींचे कोलमडलेले संसार आपल्या एका फोनने पुन्हा सावरले आहेत. काहींना जीवदान मिळाले आहे.
दादा, कामाचाच माणूस आहे. हे आपले वाक्य त्रिकालाबाधित सत्य ठरते. एखाद्याच्या जीवनात अस्ताला जाणारा सूर्य रोखून धरण्याची ताकद असलेला आमचा नेता, स्वतःला वाचवू शकला नाही, अथवा स्वतःला वाचविण्यासाठी क्षणभराचाही अवधी कोणाला दिला नाही, याचेच मोठे शल्य आहे.
दादा, हा सामान्यांचा आणि कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र सदैव आपल्या ऋणात राहील.
@ अरुण बोऱ्हाडे …✍️
(मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे)










































