बीडमध्ये खळबळ! राम खाडे प्रकरणाने तापले वातावरण; वकील असीम सरोदे यांचा धक्कादायक दावा

2 Min Read

दि.२९(पीसीबी)-बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून मोठ्या हलचालींनी आणि गंभीर आरोपांनी गाजत आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याचे प्रकरण पुढे आणणाऱ्या राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राम खाडे यांनी सुमारे हजार कोटींच्या जमिनींचे हडप प्रकरण उघड केले होते आणि या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांचे नाव समोर आले होते. या सर्व घडामोडींनंतर आता वकील असीम सरोदे यांनी एक धक्कादायक खुलासा करत स्वतःच्या जीवाला देखील धोका असल्याचा दावा केला आहे.

राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या अनेक कागदपत्रांवरून देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी खासगी स्वरूपात दाखवत त्यावर प्लॉट पाडून विक्री केल्याचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे ते सातत्याने सांगत होते. पोलिसांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने हे प्रकरण थेट मुंबई येथील ईडी कार्यालयात तक्रारीसह सादर करण्यात आले होते. या तक्रारींसोबत दोन ते तीनशे कागदपत्रे जोडल्याचेही सांगितले जाते.

या गंभीर आरोपांमुळे राम खाडे यांनी सुरेश धस यांच्यावर थेट बोट ठेवले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर हल्ला झाला आणि सध्या ते पुण्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. हल्ल्यानंतर राम खाडे यांच्या जवळच्या लोकांनी सुरेश धस यांच्याच लोकांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान वकील असीम सरोदे यांनी देखील पुढे येत सांगितले की, या प्रकरणात पुरावे इतके स्पष्ट आहेत की, हजार कोटींच्या वरच्या जमिनींच्या गैरव्यवहारात सुरेश धस सहभागी असल्याचे दिसत होते आणि आता त्यांच्या कडून माझ्या जीवाला देखील धोका असल्याची मला जाणीव होत आहे.

या सर्व दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून भाजपा आमदार सुरेश धस यांची अडचण वाढल्याचे चित्र दिसत आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याचा आणि मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने या प्रकरणात भाजपाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणा कोणते पाऊल उचलते, आरोपींकडून काय प्रतिक्रिया येते आणि ईडीकडून याबाबत पुढील कारवाई कधी होते याकडे आता राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Share This Article