शेतीच्या वादातून चुलत भावावर जीवघेणा हल्ला; भावाचे हातपाय तोडले, नात्याला काळिमा फासणारी घटना

2 Min Read

दि . २८ ( पीसीबी ) दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शेतीच्या बांधावरून निर्माण झालेल्या वादातून चुलत भावानेच शेतकरी कैलास हगारे यांच्यावर कोयता, तलवार व कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यांचा उजवा हात व डावा पाय तोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी यवत पोलिसांनी प्रवीण हगारे व नंदा हगारे या सख्ख्या भावांना अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
या प्रकरणी जखमी कैलास हगारे यांची मुलगी अनुष्का हगारे हिने यवत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वीपासूनच हगारे कुटुंबीयांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. गुरुवारी या वादाचा विकोप होऊन सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे, नंदा हगारे, प्रतीक्षा हगारे आणि प्रांजल हगारे (सर्व रा. बिरोबावाडी, ता. दौंड) या सहा जणांनी मिळून धारदार शस्त्रांद्वारे कैलास हगारे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात कैलास हगारे यांचा उजवा हात मनगटापासून आणि डावा पाय नडगीपासून तोडण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रवीण व नंदा हगारे यांना अटक केली असून, इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे आणि गणेश हगारे यांनी कैलास हगारे यांना मारहाण करत डावा पाय गंभीर जखमी केला होता. त्या प्रकरणातही यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण संपांगे करीत आहेत.

Share This Article