खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंना धक्का देणार ?

2 Min Read

धाराशिव, दि. २७ : ठाकरे गटात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. धाराशिवचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात प्रताप सरनाईक यांनी राजकीय फेरबदलाचे संकेत दिले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुजरातच्या वाटेवरुन परत आलेले कैलास पाटील यावेळी वेगळी वाट धरणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. परंतु, सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार असं नाही, संघर्ष करु आणि पक्ष वाढवू, असं आमदार कैलास पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

कैलास पाटील काय म्हणाले?
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अस्वस्थ असलेले लोक आम्ही पक्ष सोडणार असल्याचे संकेत देत आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत आहे, तर कुणाच्या वागण्यातून. मात्र ठाकरे गटात अस्वस्थता कुठेच नाही. शिंदेंच्या बंडावेळी काहीतरी चुकीचं घडतंय असं लक्षात आलं, मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात होतोच, जीवावर उदार होऊन मी परत आलो, याची आठवण कैलास पाटील यांनी करुन दिली.

ठाकरेंची साथ सोडणारे आम्ही नाही
आम्हाला आमदार वगैरे पदं ही शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहेत, याची आम्हाला जाण आहे. त्यामुळे आम्ही ठाकरेंसोबत कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही असू. वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही, अस्वस्थ कोण आहे, तुम्हीच पाहा. आम्ही संघर्ष करु आणि आमचा पक्ष वाढवू, सत्ता आली नाही, म्हणून पक्षबदल करणारे किंवा उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे आम्ही नाही, आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबत आहे, असं कैलास पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

Share This Article