बटरफ्लाय पूलाचा खर्च २५ कोटींचा ४० कोटी कसा ?

0
6

भ्रष्टाचाराची सखोल चौकशीची मारुती भापकर यांची मागणी
पिंपरी, दि. २२ –
चिंचवडगाव, थेरगाव मधून वाहणाऱ्या पवना नदीवर फुलपाखरू (बटरफ्लाय) आकाराच्या पुलाचा २५ कोटी रुपये खर्च ४० कोटी कसा झाला याची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्याप्रमाणे कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, थेरगाव येथील प्रसुनधाम हौसिंग सोसायटी शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर चिंचवडगाव-थेरगाव हा फुलपाखरू (बटरफ्लाय) पूल बांधण्याचे काम महापालिकेने २०१७ मध्ये हाती घेतले. हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणारा आहे. निविदा खर्च २५ कोटी १९ लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामध्ये धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांनी १४ टक्के म्हणजेच २८ कोटी ७१ लाख रुपयांंची निविदा भरली. अन्य दोन ठेकेदारांपेक्षा त्यांचा दर कमी असल्याने त्यांना या पुलाचे बांधकाम देण्यात आले. पुलाची १०७ मीटर लांबी, तर १८ मीटर रुंदी आहे.१८ महिन्यांच्या मुदतीत पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
या पुलासाठी थेरगाव बाजूकडील पोहोच रस्त्यास भिंत बांधणे, मुरूम भराव करणे, रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण, तसेच चिंचवड बाजूकडील रस्त्याचे ‘सबग्रेड’चे काम, डांबरीकरण आणि दिशादर्शक फलक अशी कामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ११ कोटी तीन लाख रुपयांचे काम एस.सी. कटारीया या ठेकेदाराला देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कामाची मुदत सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुलाला जोडणाऱ्या एका बाजूचे काम अपूर्ण आहे. या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुलाच्या दोन टप्प्यातील कामावर ३९ कोटी ७४ लाख रुपये खर्च होऊनही पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना पुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

२५ कोटी रुपयांच्या पुलावर ४० कोटी रुपयांचा खर्च होऊन देखील हे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. या पुलाच्या कामांमध्ये संबंधित ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व लोकप्रतिनिधी यांनी संगणमत करून मोठा भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची तज्ञ लोकांकडून सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, असे भापकर यांनी म्हटले आहे.