ताबा घेण्याच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

0
4

दापोडी, दि. 12 (पीसीबी) : न्यायालयाच्या आदेशाने घराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या वकील, फायनान्स कंपनीचे अधिकारी, पोलीस यांना घर मालक आणि घरातील सदस्यांनी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. ११) सकाळी मोरेश्वर रेसिडेन्सी, दापोडी येथे घडली.

अनिल भुंडाराम चौधरी (२५), कमला अनिल चौधरी (वय २८), भुंडाराम जोधाराम चौधरी (वय ४९), पालीदेवी भुंडाराम चौधरी (वय ४०, चौघे रा. दापोडी), मकरंद शंकरदेव (वय ४८, रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विशाल व्यंकटराव मनाळे (वय २९, रा. पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी यांच्या घराचे हप्ते थकल्याने एल अँड टी फायनान्स कंपनीने न्यायालयाकडून घराचा ताबा घेण्याचा आदेश घेतला. त्यानुसार कंपनीचे वकील विशाल मनाळे, कंपनीचे अधिकारी, पोलीस हे कॅमेऱ्याच्या निगराणीत ताबा घेण्याची कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी मनाळे, कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मनाळे यांच्या सोबत बाचाबाची करून मारहाण केली. पोलिसांना धक्काबुक्की केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.