प्रलोभनास बळी न पडता मतदान करू

0
39
  • सिलेस्टियल सिटी सोसायटीमधील सभासदांनी घेतली शपथ

थेरगाव, दि. ११ – “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ रावेत येथील सिलेस्टियल सिटी या सोसायटीमधील सभासदांनी घेतली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या स्वीप टीमच्या वतीने रावेत येथील सिलेस्टियल सिटी या सोसायटीमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमन प्राजक्ता रुद्रवाल, विलास गव्हाणे व इतर सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा निर्धार केला तसेच इतरांनाही मतदानाचे महत्व पटवून देऊन शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

स्वीप टीमचे समन्वय अधिकारी राजीव घुले यांच्या अधिपत्याखाली दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे यांनी हे अभियान यशस्वीपणे पार पाडले.

सिलेस्टियल सिटी सोसायटीमध्ये २२ विंग असून ७०४ फ्लॅट आहेत. त्यानुसार या सोसायटीमध्ये सुमारे ३००० नागरिक वास्तव्यास आहेत. सोसायटीमध्ये राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षात घेता आणि त्यांच्या सोयीसाठी येथे मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या परिसरात स्वीपच्या मदतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.