वाकड, दि. ०१ (पीसीबी) : वाकड येथील रस्त्यांवर पथदिवे लावण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडलेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते श्री विशाल वाकडकर यांनी वारंवार पाठपुरावा केला असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वाकड हिंजवडी नवीन लिंक रोड वरील रॉयल मिराज सोसायटीच्या बाजूस असणारा तीस मीटर रुंदीचा रस्ता तयार झाला असून पुढे हा रस्ता हिंजवडी कडे जातो आहे. सदरील रस्त्याचे पालिका हद्दीतील काम पूर्ण झाले असून. या रस्त्यावर पालिकेकडून अद्याप दिवाबत्तीची सोय करण्यात आली नाही.या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे तसेच रस्त्याच्या बाजूस ओपन जिम चे साहित्य लावण्यात यावे यासाठी श्री विशाल वाकडकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. सध्या या रस्त्याचा उपयोग सकाळी ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी करत आहेत. संध्याकाळी या भागात पथदिवे नसल्याने अनेक गैरप्रकार सुरू असतात. पदपथावर सध्या भटक्या लोकांनी अतिक्रमण केले आहे.
वाकड आणि लगतचा भाग हा आयटी नगरीचा आहे या रस्त्यावर पालिकेकडून अशाप्रकारे दुर्लक्ष करणे हे खूप नुकसानकारक आहे.
पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यावर पथदिवे लावून त्याची वेळेवर देखभाल दुरुस्ती करावी अशी प्रामुख्याने मागणी केली आहे.
“पालिका प्रशासनाला सदरील रस्त्यावर पथदिवे लावण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही ते दुर्लक्ष करत आहेत. येथे जे काही गैरप्रकार घडत आहेत यातून काही दुर्घटना घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल”.