महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’मध्ये ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

0
68

आतापर्यंत १५० हून अधिक दिव्यांगानी घेतला विविध सुविधांचा लाभ; शहरातील जास्तीत जास्त दिव्यांगानी लाभ घेण्याचे आवाहन

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा दिव्यांगांच्या हक्कासाठी पुढाकार घेण्यामध्ये संपुर्ण देशामध्ये अग्रेसर असल्याचा नावलौकिक आहे. महानगरपालिकेने आजपर्यंत दिव्यांगांचे हित जोपासण्यासाठी व त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रभावी योजना राबविल्या आहेत. त्याचधर्तीवर, महानगरपालिकेने कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत, मोरवाडी, पिंपरी येथे ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ची स्थापना केली. दिव्यांग भवनाच्या माध्यमातून २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींवर उपचार (थेरपी), दिव्यांगास सहाय्यभूत उपकरणांचे वितरण, दिव्यांगाचे कौशल्य विकास व त्यांचे पुनर्वसन व सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे.

‘दिव्यांग भवन फाउंडेशन’मध्ये ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुदानीत असलेल्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’साठी ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ३१ संवर्गामध्ये ४० उमेदवारांची निवड करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ३ संवर्गामध्ये ३ उमेदवारांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पुर्ण झाली असून सर्व पात्र उमेदवार कामावर रुजू झालेले आहेत. अशी माहिती दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिली.

आजपर्यंत १५० हून दिव्यांगांनी घेतला थेरपी सुविधेचा लाभ
‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ येथे नियोजनानुसार आजतागायत १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी थेरपी सुविधेचा लाभ घेतला आहे. त्यासोबतच दिव्यांग भवन येथे पार पडलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक दिव्यांगांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. त्यासोबतच, १२० दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत उपकरणे देण्यात आली आहेत.

सर्व ‘यूडीआयडी’ कार्ड धारकांनी थेरपी सारख्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा !
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व यूडीआयडी (UDID) कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग भवन येथे भेट देऊन थेरपी सारख्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा,असे दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.

दिव्यांग भवन येथे लवकरच सुरु होणार ‘दिव्यांग कक्ष’
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन येथे लवकरच ‘दिव्यांग कक्ष’ सुरु करणार आहोत,अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.

सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींस समानूभुतीने सेवा द्यावी !
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनसाठी नवनियुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील आहे. दिव्यांग भवन येथे नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिव्यांग भवन येथे येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समानूभुतीने सेवा द्यावी.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे

लवकरच घरोघरी जाऊन दिव्यांग सर्वेक्षण करण्यात येणार !
दिव्यांग भवन येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कर्मचाऱी कामावर रुजू सुध्दा झाले आहेत. त्याचबरोबर, शहरातील १५० हून अधिक दिव्यांगांनी विविध सेवा-सुविधेचा लाभ सुध्दा घेतला आहे. याचबरोबर, येत्याकाळामध्ये लवकरच घरोघरी जाऊन दिव्यांग सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
– प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

दिव्यांगांना सर्व थेरपींचा नियोजनबद्ध पद्धतीने मिळणार लाभ
दिव्यांग भवनमध्ये नवनियुक्त कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे शहरातील दिव्यांगांना अधिक जलद सुविधा देण्यासाठी दिव्यांग भवनची कार्यक्षमता वाढली असून येत्याकाळामध्ये पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांगांना नियोजनबद्ध पद्धतीने सर्व थेरपीचा लाभ मिळणार आहे.
– तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका