मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्यास अटक; सात पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे जप्त

0
33

चिंचवड, दि. 15 (प्रतिनिधी)

मध्यप्रदेश मधून पिस्तूल आणून त्याची पिंपरी चिंचवड शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

प्रदिप ऊर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय 28, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), सुरज अशोक शिवले (वय 24, रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), नवल विरसिंग झामरे (वय 23, रा. पेरणे फाटा, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), कमलेश ऊर्फ डॅनी कानडे (वय 29, रा. भारतमाता चौक, मोशी, पुणे), पवन दत्तात्रय शेजवळ (वय 35, रा. नारायणगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सुरुवातीला तीन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन जप्त करण्यात आली. त्यानंतर तिघांकडे तपास करत आरोपी नवल झामरे हा मध्य प्रदेश राज्यातून पिस्तूल घेऊन येत असे. तो पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्या पिस्तूलची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

झामरे याने कमलेश कानडे याच्या मार्फतीने पवन शेजवळ याला पिस्तूल विकले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. तसेच झांबरे याच्याकडून आणखी तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमध्ये एकूण सात पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, दोन मॅक्झिन, एक स्कॉर्पिओ कार असा एकूण 15 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी पवन शेजवळ याच्या विरोधात चोरी तसेच घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी कमलेश कानडे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे एक) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, हर्षद कदम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, विशाल गायकवाड, नितीन उम्रजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, प्रविण कांबळे, चंद्रकांत गडदे, बाबाराजे मुंडे, अमर कदम, समिर रासकर, राहुल खारगे, औदुंबर रोंगे, तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.