जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी

PCB Admin
2 Min Read
  • ह.भ.प. डॉ. भावार्थ महाराज देखणे

वारकरी संतांनी आपल्याला वारीचे महत्त्व पटवून दिले आहे. वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो एक संस्कार आहे. वारीतून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडते. त्यामुळे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. डॉ. भावार्थ महाराज देखणे यांनी केले.

चिंचवड, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर येथे भोलेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सव आणि नागरिक सत्कार समारंभात ते बोलत होते. सोमवारी (दि. २४) झालेल्या या कार्यक्रमात डॉ. भावार्थ महाराज देखणे यांचे कीर्तन झाले. यावेळी आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, देहूतील संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संस्थानचे विश्वस्त नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. महेश सूर्यवंशी, भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत बागल, नगरसेवक शेखर चिंचवडे, दैनिक लोकमत चे वृत्तसंपादक विश्वास मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भावार्थ महाराज देखणे आणि ॲड. महेश सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आमदारशंकर जगताप म्हणाले, डॉ. भावार्थ महाराज देखणे आणि ॲड. महेश सूर्यवंशी यांनी आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही आनंदाची बाब आहे.

कीर्तन महोत्सवात ह.भ.प. रामलिंग महाराज मोहिते, अर्जुन महाराज जाधव, सुनील महाराज काळे, माउली महाराज आढाव, जगन्नाथ महाराज जगताप आणि सतीश महाराज बुजाडे यांची कीर्तने झाली. दत्तात्रय चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, श्रीधर वाल्हेकर, बाबाजी चिंचवडे, राजाभाऊ चिंचवडे, निलेश आहेर, संतोष जाधव, राजकुमार काळे, संदीप चिंचवडे, योगेश जाधव, सचिन काळभोर, हनुमंत हाके, पांडुरंग महाराज चिकने आणि नरहरी स्वप्ने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
चिंचवडेनगर येथे भोलेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. महेश सूर्यवंशी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. डॉ. भावार्थ महाराज देखणे यांचा सन्मान करण्यात आला.

Share This Article