आणखी एका अनधिकृत शाळेवर गुन्हा

0
136

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल यानंतर आता पिंपळे गुरव येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलास दयाराम पाटील (वय 51, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत खोडदे (रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एप्रिल 2024 पासून 17 जुलै 2024 या कालावधीत शाळेचे संचालक चंद्रकांत खोडदे यांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटीची पूर्तता केली नाही. अनधिकृतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पालकांकडून फी वसूल केली आहे. शाळा अनधिकृत असताना अधिकृत असल्याचे दाखवून विद्यार्थ्यांचे दाखवले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यापूर्वी चिंचवड मधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूलचे श्रेयकुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डीकोस्टा (रा. बंगलोर) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरात अनधिकृत शाळा चालविल्या प्रकरणी तिसऱ्या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.