पुणे आणि नाशिक जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या कुख्यात चोरट्यांना अटक

0
163

पाच लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त; नऊ गुन्हे उघड

चिंचवड , दि. २९ –
पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या दोन कुख्यात चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने निगडी मधून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख 35 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

दीपक भगवान जाधव (वय 26, रा. चाकण. मूळ रा. पाथरी, ता. जि. जळगाव), सचिन साहेबराव पगार (वय 31, रा. एमआयडीसी सातपूर, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बनकर आणि राहुल खारगे यांना माहिती मिळाली की, दोन संशयित निगडी परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोघांना एका दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी (एमएच 12/एनजी 5308) बाबत चौकशी केली असत ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, देहूरोड, भोसरी, पिंपरी, खडकी, हडपसर परिसरात चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांकडून सोनसाखळी चोरीचे सात आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून त्यातील पाच लाख 35 हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. या कारवाईमुळे हिंजवडी, पिंपरी, पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, एमआयडीसी भोसरी, देहूरोड, भोसरी, खडकी, हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी दीपक जाधव याच्यावर यापूर्वी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे. तर सचिन पगार याच्यावर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, अंबाड, म्हरूळ पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, सुरश जायभाय, सुखदेव गावंडे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.