एमडी प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर अपहरण व खंडणी प्रकरणातील दोन शिपाई शासकीय सेवेतून बडतर्फ

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

सांगवी परिसरात एका व्यक्तीला एमडी ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्या प्रकरणांमध्ये निगडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी उपनिरीक्षकाला देखील बेड्या ठोकल्या. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल 45 किलो एमडी ड्रग्स जप्त केले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाला गांजा जवळ बाळगल्याच्या खोट्या केस मध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणातील पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजळ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

Share This Article