अजित डोवल बनले सर्वाधिक वजनदार सरकारी अधिकारी  

0
790

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे (एसपीजी) अध्यक्ष करण्यात आले आहे. या नव्या जबाबदारीमुळे ते सर्वात वजनदार सरकारी अधिकारी बनले आहेत. विदेशी, देशांतर्गत आणि आर्थिक सुरक्षा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) मदतीसाठी १९९९ मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली होती.

अजित डोवल आता एसपीजीच्या बैठकांचे संयोजन करतील. त्याचबरोबर कॅबिनेट सचिवांनी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय साधण्याचे ते काम करतील. यापूर्वी कॅबिनेट सचिवांकडे एसपीजीचे अध्यक्षपद होते. मात्र, आता एसपीजीच्या अध्यक्षपदी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मोदी सरकारने ११ सप्टेंबर रोजी अधिसुचना जारी केली होती.

एसपीजीच्या इतर सदस्यांमध्ये तीनही सैन्यदलांचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख, गृह सचिव, वित्त सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे.