निगडीतील टँकर अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा

0
143

निगडी – निगडी येथील भक्ती शक्ती पुतळ्याजवळ रविवारी (दि.25) पहाटे एलपीजी गॅस चा टँकर उलटून अपघात झाला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्रप्रसाद कुंजलराम यादव (वय 52 राहणार उत्तर प्रदेश) असे टँकर चालकाचे नाव असून तो सध्या जखमी असल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

राजेंद्र प्रसाद यादव हा त्याच्या ताब्यातील एलपीजी गॅस नि भरलेला टँकर (एम.एच.04 जे.के.2337)घेऊन मुंबई कडून सोलापूर कडे जात होता. यावेळी त्याने वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता भरधाव वेगाने टँकर चालवल्याने तो भर रस्त्यावर उलटला. यावेळी पोलीस, अग्निशामक दल ,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच भारत पेट्रोलियम यांच्या टीमने तब्बल 14 तास मेहनत करत पलटी झालेल्या टँकर मधून एलपीजी एलपीजी गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकर मध्ये रिफील केला. यावेळी खबरदारी म्हणून आसपासच्या तीनशे मीटर पर्यंतचा परिसर पोलिसांनी काही काळ बंद ठेवला होता तर महावितरण कडून ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत निगडी परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

यंत्रणेने वेळीच पावले उचलल्यामुळे काल पिंपरी चिंचवड शहरातील मोठा धोका टळला मात्र याची जाणीव असतानाही चालकाने वाहतुकीचे नियम मोडत भरधाव वेगाने टँकर चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.