चिखली, दि.११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. अज्ञात तिघांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास चिखली परिसरातील सरस्वती शाळेजवळ ८ ते १० वाहनांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन जणांनी चिखलीतील सरस्वती शाळेजवळ पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करत वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात कोयते घेऊन तिघांनी हुल्लडबाजी करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. काही महिने झाले वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेले होते. परंतु, ते पुन्हा सुरू होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात शांतता नांदत होती. परंतु, पुन्हा तोडफोडीच्या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.