पुणे,दि. २ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील नेत्यांची दादागिरी आता खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे नांव न घेता दिला. हिंजवडी औद्योगिक परिसरातील रस्त्यांचे भूमीपूजन चंद्रकांतदादांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नव्हती. या कार्यक्रमाचा फज्जा उडविण्यासाठी उपस्थित राहू नका, यासाठी दोन्ही काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी फोनाफोनी केल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक साठे यांनी केला.
यावर चंद्रकांतदादा यांनी अजित पवारांचे नाव न घेता इशारा दिला. ते म्हणाले की, रस्त्यांवरून सर्वपक्षीय कार्यकर्ते जाणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी विकासात राजकारण करू नये. आम्हाला पण राजकारण करता येते. परंतु आम्ही ते विकासात आणत ऩाही, असे ते म्हणाले.
रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून कुणी टक्केवारी मागितली. कुणी दादागिरी केली. तर थेट मला फोन करा. चोवीस तास माझा फोन सुरू असतो. चांगले दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी यापुढे कुणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.