शरद पवारांनी आधी पक्ष एकसंध ठेवावा, मग आम्हाला टक्कर द्यावी – पंकजा मुंडे  

0
434

बीड,दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातील कुरघोडी  बंद करावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे बघावे, त्यानंतर त्यांनी  आम्हाला टक्कर द्यावी, असा टोला राज्याच्या ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी  पवारांना लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी खुद्द पवारांना येथे यावे लागले, हेच आमचे यश आहे. ज्या पक्षातील नेत्यांमध्ये एकी नाही, ते आम्हाला काय टक्कर देणार? असाही सवाल पंकजा  यांनी यावेळी उपस्थित केला.

बीड जिल्ह्यातील धारूर येथील एका जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.  दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करण्यासाठी तत्कालीन मंत्रिमंडळच बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, झालं काय? तर मुंडेसाहेब लाखो मतांच्या मताधिक्याने निवडून आले. अशीच स्थिती याही वेळी होईल,असा विश्वासही त्यांनी यावेळी   व्यक्त केला.

बीडमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी मेळाव्यात शरद पवार यांनी पंकजा मुंडेंवर हल्ला चढवला होता. त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान आगामी काळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होणार आहे.