दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक, अटकेची आधीच होती त्यांना पूर्वकल्पना

PCB Admin
1 Min Read

दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीय. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू झाल्याने जवळपास ५० नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.

मनीश सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणी सीबीआय़कडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांनी स्वत:च्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती. तसंच तपास यंत्रणांना आपण सहकार्य करू असेही ते म्हणाले होते.

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका केलीय. त्यांनी म्हटलं की, स्पा मसाज पार्टीचे कट्टर बेईमान MoneyShh अटकेत, सत्येंद्र जैन भ्रष्ट श्री.. मनीष सिसोदिया भ्रष्ट भूष, अरविंद केजरीवाल भ्रष्ट रत्न.

Share This Article