महाराष्ट्राच्या हद्दीत राहुल गांधी मशाल हातात घेऊन धावणार

0
272

नांदेड, दि. ७ (पीसीबी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. आज रात्री साधारण साडेसातच्या सुमारास त्यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होईल. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील.देगलूर येथील शिवाजी चौकातून ५० हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायासह हातात मशाल घेऊन राहुल गांधी पुढे मार्गक्रमण करतील. ते गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील ‘भारत जोडो यात्रेचा’ खरा प्रवास मंगळवारपासून सुरु होईल. यासाठी काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेते नांदेडच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

भारत जोडो यात्रा ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात असणार आहे. चार मुक्काम जिल्ह्यात मुक्काम असणार आहेत. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल. या सभेला काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.