मृतदेह अदलाबदलीची सात दिवसात होणार चौकशी; आयुक्तांची माहिती

0
240

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – महापालिकेच्या वायसीएम रूगाणालयातील डेडहाऊसमधून मृतदेहाची अदलाबदल झालेल्या प्रकाराची सात दिवसात चौकशी केली जाणार आहे. दोषींवर 100 टक्के कारवाई करणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त सिंह म्हणाले, ”मृतदेह अदलाबदलीची घटना दुर्देवी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांनी वायसीएमला भेट देवून सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. समितीला सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळणा-यांवर निश्चित कारवाई केली जाईल. वायसीएमएचमधील प्रक्रिया सुलभ, सहज सोपी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डॉ. वाबळे यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वायसीएमच्या कार्यप्रणालीत सुधारणा केली जाईल”.

वायसीएममध्ये नेमके काय घडले?
दापोडीतील स्नेहलता अशोक गायकवाड यांचा सीमाभिंत अंगावर पडल्याने उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात कोल्ड स्टोरेज नसल्याने मृतदेह वायसीएममधील डेडहाऊसमध्ये ठेवला होता. आज सकाळी शवविच्छेदन केले. नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी गेले असता लेबल वर स्नेहलता यांचे नाव होते. परंतु, त्यांचा मृतदेह नव्हता. त्यानंतर मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.