पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – सर्वसामान्यांच्या मोटारीला काळ्या काचा आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत. सर्वसामान्यांना लागू होणारा नियम पोलीस आयुक्तांना लागू होत नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गुन्हेगार, दहशतवादी यांना लपता येऊ नये यासाठी मोटारीला काळ्या फिल्म असलेल्या काचा लावू नयेत असा आदेश शासनाने काढला आहे. त्यानुसार पोलीस ठिकठिकाणी तपासणी करून काळ्या फिल्म लावलेल्या काचा असलेल्या मोटारींच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. काळ्या फिल्म जागेवर काढून टाकण्यात येतात. पोलिसांच्या या कारवाईच्या धास्तीने मोटारीच्या काचांना काळी फिल्म लावणे, आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे वापरत असलेल्या मोटारीच्या (CP Car) काचा काळ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख काळ्या काचा असलेली मोटार वापरत असतील, तर त्यांच्यासाठी काही वेगळा नियम आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

सर्वसामान्य मोटार मालकांना लावण्यात येणारा नियम पोलीस आयुक्तांना ही लावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे एका कार्यक्रमात असल्यामुळे याबाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही. पोलीस आयुक्तांशी संपर्क होताच त्यांची बाजू बातमी समाविष्ट करण्यात येईल.

Share This Article