बंडखोर बांगर यांना धक्का, शिवसेना पदाधिकारी ठाकरेंच्या मागे

0
280

हिंगोली, दि. १२ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता हिंगोलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण जिल्ह्याप्रमुख संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख आणि सर्व उपजिल्हाप्रमुख, तसंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष बांगर हे बंडखोर शिंदे गटात सामील झाल्याने त्यांची जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईमध्ये बैठक संपन्न झाली. पुढील काही दिवसांत शिवसेनेचा नवीन जिल्हाप्रमुखही जाहीर करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी काल सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातून रवाना झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कोणाला मिळणार, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलं असून जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकजण मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे समजते. सेनगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, हिंगोली तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख रमेश शिंदे, त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील काही जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.