‘राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’

0
303

नाशिक, दि.१८ (पीसीबी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नाशिकमध्ये आज सकाळी 15 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये युती होण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. “मनसे भाजप युती ही नाशिककरांसाठी नवीन नाही, काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात, तेव्हा काय बोलणार?” अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली. “राज ठाकरे आणि चंद्रकांत दादा यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही. पण मनसे-भाजप युती ही नाशिककरांसाठी नवीन नाही. भाजपसोबत युती करण्याचा निर्णय राज साहेब घेतील. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकतात, तेव्हा काय बोलणार?” असं संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेने मुंबईची वाट लावली, अशी टीकाही देशपांडेंनी केली.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्रामगृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली.

यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते. अनेक वेळा राज हे चंद्रकांतदादांच्या बोलण्यावर मान डोलवतानाही दिसत होते. दोघांचीही बॉडी लँग्वेज खूप काही सांगत होती. यावेळी दोन्ही नेत्यांशिवाय कोणीच नव्हते.

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असं काही नाही, असंही त्यांनी सांगितलं.