देशात मृत्यूचे तांडव सुरूच…सलग चौथ्या दिवशी धडकी भरवणारा आकडा आला समोर

0
388

नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक थांबवण्यासाठी उशिराने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचं दृश्य देशभरात दिसत आहे. उद्रेक झाल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी करोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. देशात दररोज चार लाखांच्या आसपास करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून, गेल्या चार दिवसांपासून समोर येणारे मृत्यूंचे आकडे झोप उडवणारे आहेत.

देशात करोनाचा प्रकोप सुरू असल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेनं सौम्य ठरवली असून, देशात दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहे. गेल्या २४ तासांतील परिस्थितीही अशीच असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने चिंतेत भरच टाकली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ करोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.