संत तुकाराम नगरमध्ये श्रावण सोमवार विशेष रुद्रपूजा व आर्ट ऑफ लिव्हिंगचा ४५ वे वर्ष पूर्ति वर्धापनदिन उत्साहात साजरा

bpcauthor
3 Min Read

पिंपरी, दि. २ : आर्ट ऑफ लिव्हिंग – वेदिक धर्म संस्थानच्या संत तुकाराम नगर येथील केंद्राच्या वतीने संत तुकाराम महाराज मंदिर येथे श्रावण सोमवार विशेष रुद्रपूजा तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या वर्ष वर्धापनदिनानिमित्त विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून ६०० हून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रुद्रम् मंत्राच्या पवित्र सान्निध्यात भाविकांनी गहन ध्यानाचा अनुभव घेतला. त्यानंतर झालेल्या भजन-सत्संगामध्ये लहान मुले, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नृत्य व भक्तिमय वातावरणात आर्ट ऑफ लिव्हिंगचा ४५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला.

समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी, नैराश्य दूर करून सकारात्मक ऊर्जा आणि आनंदमय वातावरणाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या विशेष रुद्रपूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या रुद्रपूजा व सत्संगाला आर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगळुरू आश्रमातून आलेले कर्ते मोहन पद्मनाभन जी, वेदपंडित चंद्रा मिश्रा, मीथीर शर्मा तसेच साध्वी कनकेक्श्वरी यांचे सान्निध्य लाभले.

सत्संग कलाकार निशिकांत दळवी, शिवानंद वैरागकर, ललित वाघ आणि क्षितिज भट यांनी आपल्या भक्तिगीतांनी, भजनांनी आणि वाद्यांच्या तालाने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय झाले होते.

कार्यक्रमातील सहभागी भाविकांनी या उत्सवाचा अनुभव अद्भुत, आनंददायी आणि अविस्मरणीय असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचाही आनंद घेतला.

या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संत तुकाराम नगर केंद्रातील लहान मुले, तरुण तसेच ज्येष्ठ स्वयंसेवकांनी तब्बल १५ दिवस अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या अथक सेवेमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

आर्ट ऑफ लिव्हिंग – वेदिक धर्म संस्थानच्या वतीने संपूर्ण श्रावण महिन्यात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी रुद्रपूजांचे आयोजन करण्यात आले.

हृदयविकाराचा झटका, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी व आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत इंडस हेल्थ प्लसचे भगवान परिहार व सचिन नाईक यांनी उपस्थितांना रुद्रपूजा व सत्संगानंतर मार्गदर्शन केले.

यावेळी “रोगमुक्त शरीर, तणावमुक्त मन आणि आनंदी, उच्चतम जीवन” या उद्देशाने संत तुकाराम नगर येथे १७ सप्टेंबरपासून आयोजित होणाऱ्या गणेशोत्सव विशेष Happiness Program (प्रसन्नता शिबिरात) सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन नाईक यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर संस्था, समाजसेवक दीनानाथ जोशी तसेच अनेक भक्त व दात्यांचे मोलाचे योगदान लाभले.

*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संत तुकाराम नगर केंद्रातील सर्व स्वयंसेवक, दाते, मंदिर संस्था आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Share This Article