तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

3 Min Read

दि.२१(पीसीबी)-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांमुळेच हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षातील त्यांच्या तोडीचा कोणताही नेता या विषयावर चर्चा करण्यास तयार असेल, तर आपण खुल्या चर्चेसाठी सज्ज असल्याचे आव्हानही फडणवीस यांनी दिले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये ट्विट केलं होतं, त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा? त्यात त्यांनी ऐतिहासिक क्षण असं लिहिलं होतं, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट वाचून दाखवलं. हे काय होतं हे फडणवीस यांनी समजावून सांगावं. जर आता तुम्ही म्हणत असाल की विरोधकांमुळे विधेयक पडलं तर या ट्विटचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अमित शाह यांनी देखील 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं, असं ट्विट केलं होतं. ते ट्विट देखील सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलं. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, फडणवीस साहेब तुमचं काय म्हणणं आहे? खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे? हे लोकांना कळू द्या. देवेंद्र फडणवीस काल रेटून खोट बोलत होते. जेव्हा महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये संसदेत मांडलं जात होतं, त्यावेळचं भाषण देखील सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलं. बिल पास झालं, असं त्यावेळी अमित शाह यांनी सांगितलं होतं, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2023 मधील भाषण देखील सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलं.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, काल विधेयकाची भ्रूण हत्या झाली, असं फडणवीस म्हणाले. भ्रूण हत्या हा शब्द त्यांनी वापरला. त्यांना या शब्दाचा अर्थ कळला नसेल, त्यांना या शब्दाचं गांभीर्य नाही. सगळ्यात आधी महिला आरक्षणाची भ्रूण हत्या 1951 मध्ये झाली. या विधेयकाला कोणी त्यावेळी विरोध केला. याला शामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला होता. बाबासाहेब हे बिल मांडत होते, त्यावेळी या लोकांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर 1951 मध्ये बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. देवेंद्र फडणवीस साहेब तुमची तयारी आहे का? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायची? तेही महिलांसाठी… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रात राजीनामा दिला होता, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Share This Article